[ahmednagar] - कोणत्या ‘गडावर’ होणार गर्दी?

  |   Ahmednagarnews

पाथर्डी:

बीड जिल्ह्यातील घाट सावरगाव येथे राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आज (१७ ऑक्टोबर) होणाऱ्या मेळाव्यास पाथर्डी तालुक्यातून विक्रमी गर्दी करण्याचा निर्धार मुंडे समर्थकांनी केला आहे. तर, दुसरीकडे भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांच्या काही समर्थकांनीही 'चलो भगवानगड'चा नारा दिल्याने आज भगवानगडावर नेमके किती भाविक भगवान बाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी येणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, 'दसऱ्याच्या दिवशी भगवानगडावर मेळावा घेण्याची परंपरा पूर्वापार चालू असली तरी १९९५ साली भगवानगडावर दसऱ्याच्याच दिवशी माजी केंद्रीयमंत्री बबनराव ढाकणे व स्व. गोपीनाथ मुंडे यांचा जाहीर वाद झाल्याने भगवानगड राज्याच्या राजकीय पटलावर ठळकपणे समोर आला. भगवानगड हा उसतोड मजुरांचे श्रद्धास्थान असल्याचे हेरत मुंडे यांनी दसऱ्याच्या दिवशी पार पडणाऱ्या मेळाव्याला मोठे स्वरूप देत उसतोड मजुरांवरील आपली पकड आणखी घट्ट केली. गडावर आपण राजकरण करत नाही, असे मुंडे नेहमी म्हणत असले तरीही त्यांनी या मेळाव्याच्या निमित्ताने राज्याच्या व देशाच्या राजकारणात सक्रीय असणाऱ्या अनेक बड्या नेत्यांना गडावर आणत गडाचे महत्व देशपातळीवर नेल्याने गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे नेहमीच लक्ष लागून राहिलेले असायचे. मुंडे यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर ही परंपरा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दोन वर्ष चालवली. मात्र, त्यानंतर गडाचे महंत नामदेवशास्त्री व पंकजा मुंडे यांचे मतभेद झाल्याने मागील वर्षांपासून पंकजा मुंडे यांनी भगवानबाबांचे जन्मस्थळ असलेल्या बीड जिल्ह्यातील घाट सावरगाव येथे दसरा मेळावा घेण्यास सुरवात केली. या मेळाव्यास मोठ्या संख्येने हजेरी लावावी, असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, आमदार मोनिका राजळे, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, भाजप तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, राहुल कारखेले आदी कार्यकर्त्यांनी केले आहे. त्यासाठी गावोगावी बैठका घेऊन नियोजन करण्यात आले आहे. पाथर्डी तालुक्यातून मोठ्या संख्येने मुंडे समर्थक या मेळाव्यास जाणार असले तरीही नामदेव शास्त्री यांच्या काही समर्थकांनीही 'चलो भगवानगड'चा नारा देत भगवान गडावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमावी, असे नियोजन केले आहे. या नियोजनाचा एक भाग म्हणून दसऱ्याच्या दिवशी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना सुद्धा गडावर येण्याचे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, धनंजय मुंडे यांनी या वादात पडण्यास नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर आज भगवानगडावर नेमकी किती गर्दी होणार याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

फोटो - http://v.duta.us/jS-RwgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/1_GZjwAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬