[ahmednagar] - कांद्याला उच्चांकी तीन हजार ६०० रुपये भाव

  |   Ahmednagarnews

म. टा. प्रतिनिधी, नगर

नगर जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत. श्रीरामपूर बाजार समितीमध्ये कांदा विक्रीसाठी आलेल्या एका शेतकऱ्याच्या कांद्याला क्विंटलला तीन हजार ६०० रुपये विक्रमी भाव मिळाला आहे. यंदा पहिल्यांदाच विक्रमी भाव वाढलेला आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथील अंबादास माताडे यांनी बाजार समितीत नऊ क्विंटल कांद्या विक्रीसाठी आणला होता. केशव गोविंद ट्रेडर्सने कांद्याला क्विंटलला सर्वाधिक ३ हजार ६०० रुपये भाव दिला. चांगल्या दर्जाच्या कांद्या असल्याने हा भाव काढण्यात आलेला. दुसऱ्या एका शेतकऱ्याने तीस गोण्या विक्रीसाठी आणल्या होत्या. या कांद्याला क्विंटलला साडेतीन हजार रुपये भाव काढण्यात आला होता. अंबादास माताडे या शेतकऱ्याची कांद्या विक्रीची पावती आता सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे. श्रीरामपूर बाजार समितीमध्ये मोठ्या कांद्याला क्विंटलला सरासरी अडीच हजार ते तीन हजार भाव आहे. तर लहान आकाराच्या गोलटी कांद्याला १ हजार ५०० रुपयांचा भाव आहे. गेल्या आठवड्यात कांद्याला सरासरी एक हजार रुपये क्विंटलला भाव होता. परंतु पावसाअभावी लाल कांद्याचे उत्पादन झाल्याने शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या जुन्या कांद्याला चांगला भाव मिळत आहे. जुना कांद्या कमी असल्याने बाजार समित्यांमध्ये आवक कमी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याला भाव वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी राहाता बाजार समितीमध्ये एक शेतकऱ्याला क्विंटलला तीन हजार रुपये भाव मिळाला होता. ज्या शेतकऱ्यांकडे कांद्या शिल्लक आहे. त्यांना चांगला फायदा होणार आहे. आंधप्रदेश, तामिळनाडू, मध्यप्रदेश या राज्यातून कांद्याला मागणी वाढल्याने जिल्ह्यात कांद्याचे भाव वाढले आहे. मागणी अशीच राहिल्यास आणखी भाव वाढत राहू शकतात, अशी माहिती केशव गोविंद ट्रेडर्सचे शरद वाघ यांनी दिली.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/UdeZAQAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬