[thane] - भूमिका
नसती जबाबदारी खांद्यावर कशासाठी?
ठाणे महापालिकेच्या तिजोरीत अमाप पैसा आहे की काय असा प्रश्न ठाणेकरांना सध्या पडू लागला आहे. वादग्रस्त थीम पार्क आणि बॉलिवूड पार्कवरील उधळपट्टी, वृक्षारोपणातील घोटाळा गाजत असताना आता ठाणे ते मुंबई आणि ठाणे ते नवी मुंबई या मार्गांवरील जलवाहतुकीचे आराखडे तयार करण्याची नसती जबाबदारी पालिकेने आपल्या खांद्यावर घेतली आहे. त्यासाठी ठाणेकरांकडून कररूपाने गोळा केलेले २१ कोटी रुपये खर्च केले जाणार असून ५ कोटी ७२ लाख रुपये या कन्सल्टंटला अदाही झाले आहेत. पालिकेची जी मुलभूत कर्तव्ये आहेत त्यात जलवाहतूकीचे आराखडे तयार करण्याचा उल्लेख कुठेही आढळत नाही. कायद्यानुसार जलवाहतुकीची जबाबदारी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडे आहे. परंतु, ते कोणत्याही हालचाली करत नसताना ठाणे पालिकेने त्यासाठी अट्टहास कशासाठी चालवला आहे, हे कळण्यास मार्ग नाही. केंद्र सरकार जर या कामांसाठी निधी देणार असेल तर सल्लागारांवरील उधळपट्टी ठाणे महापालिका कशासाठी करत आहे? जलवाहतुकीचा फायदा जर सभोवतालच्या शहरांना होणार असेल तर त्या त्या महापालिकांनी खर्चाची जबाबदारी विभागून घ्यायला नको का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. ठाणेकरांना मुलभूत सुविधा पुरविण्यात अपयशी ठरत असताना जबाबदारी नसलेली कामे करणे निश्चितच योग्य नाही.
येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/h90vrwAA