[nashik] - लाच मागितल्याने फौजदाराविरुद्ध गुन्हा

  |   Nashiknews

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गुन्ह्यात अटक केलेल्या महिलेला कायद्याच्या मदतीने सोडून देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमधील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाविरुद्ध नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये लाच मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

राजेंद्र अर्जुन दुनबळे असे या उपनिरीक्षकाचे नाव आहे. अॅण्टी करप्शन ब्युरोकडे (एसीबी) तक्रार करणाऱ्या तक्रारदाराच्या बहिणीस नाशिकरोड पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केली होती. त्यावेळी संशयित दुनबळे सहाय्यक पोलिस आयुक्त विभाग चार यांच्या कार्यालयात कार्यरत होते. या महिलेला सीआरपीसी कलम १६९ प्रमाणे गुन्ह्यातून सोडून देण्यासाठी सहायक पोलिस आयुक्तांची परवानगी मिळवून देण्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून दोन हजार रुपयांची लाच मागितली. त्यावरून तक्रारदाराने १० सप्टेंबर रोजी एसीबीकडे तक्रार केली. सापळापूर्व पडताळणीदरम्यान दुनबळे यांनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. एसीबीने यानंतर अनेकदा दुनबळेला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा लावला. मात्र त्यास यश मिळाले नाही. कायद्यानुसार लाच मागणे हासुद्धा गुन्हा असल्याने एसीबीने अखेर नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार दिली. दुनबळे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सरकारी विभागातील अधिकारी वा कर्मचाऱ्यांकडून लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी ०२५३-२५७५६२८, २५७८२३० किंवा १०६४ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/ei-_eAAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬