[nagpur] - संघाकडील शस्त्रे जमा करा
भारिप-बहुजन महासंघाची मागणी
म. टा. प्रतिनिधी, नागपूर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे विनापरवाना शस्त्रसाठा असल्याचा गंभीर आरोप भारिप-बहुजन महासंघाने केला. संघाने सर्व शस्त्रे तत्काळ सरकारकडे जमा करावी, अशी मागणी महासंघाचे प्रदेश सरचिटणीस सागर डबरासे व जिल्हाध्यक्ष राजू लोखंडे यांनी एका पत्रकार परिषदेत केली.
एटीएसकडून सुरू असलेल्या कारवाईत विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून शस्त्र जप्त करण्यात येत आहेत. नरेंद्र दाभोळकर, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या आरोपाखाली पकडण्यात आलेल्यांकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर संघाकडील शस्त्र साठा सरकार दरबारी जमा करावा, अशी विनंती करण्यासाठी महालातील संघ मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पोलिसांनी ही परवानगी नाकारली. या विरोधात न्यायालयात दाद मागण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
संघाच्या सर्व शाखांचा सखोल तपास करून शस्त्रांचे परवाने कुणाच्या नावे आहेत, याचीही शहनिशा करावी. संघाची कुठेही नोंदणी नाही. त्यामुळे त्यांचे आर्थिक व्यवहार वा कोणतेही कार्यक्रम सरकारला कळत नाही. त्यांचा देशाला कोणताच आर्थिक फायदादेखील नाही. सरकारने सरसंघचालकांना दिलेली झेड प्लस सुरक्षादेखील काढावी. येत्या ४ दिवसांत सरकारकडून कोणतेच प्रयत्न न झाल्यास भाजप वगळून सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनासोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही डबरासे व लोखंडे यांनी दिला.
येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/1uvrYQAA