[thane] - कार्यपद्धतीत बदल आवश्यक

  |   Thanenews

सर्वसामान्यांच्या बँक खात्यापासून ते कॉर्पोरेट कंपन्यांच्या 'डेटा चोरी'पर्यंत आणि व्हॉट्सअॅपच्या बदनामीकारक मजकुरापासून ते कम्प्युटर ब्लॉक करून वसूल केल्या जाणाऱ्या खंडणीपर्यंत (रॅनसमवेअर) प्रत्येक क्षेत्रात सायबर गुन्हेगारांचा शिरकाव झाला आहे. सायबर हल्ला होणारा भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. हा धोका दिवसागणिक वाढत असताना सुरक्षिततेसाठी अपेक्षित उपाययोजनांच्या आघाडीवर निराशाजनक वातावरण दिसते. अशा गुन्ह्यांचा स्थानिक पोलिस ठाण्यात प्राथमिक तपास होणे अभिप्रेत आहे. मात्र, तक्रार न नोंदवता स्थानिक पोलिस तक्रारदारांना सायबर सेलकडे पिटाळतात. ठाण्यासारख्या प्रगत शहरातील ही परिस्थिती आहे. त्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून स्थानिक पोलिसांना वारंवार समज द्यावी लागते, ही बाब धक्कादायक म्हणावी लागेल. सायबर गुन्हेगार ज्या झपाट्याने नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करत आहेत, त्याच्या आसपासही पोलिस यंत्रणा पोहोचू शकत नाहीत, हे वास्तव आहे. गुन्ह्यांच्या तपासासाठी ना विशेष पथके आहेत, ना अद्ययावत तंत्रज्ञान. शास्त्रशुद्ध पद्धतीने पुराव्यांचे संकलन करणारी फॉरेन्सिक लॅब ढेपाळलेली आहे, आयटी अॅक्टच्या अपुऱ्या ज्ञानामुळे सरकारी वकिलांना न्यायालयात प्रभावी युक्तिवादही करता येत नाहीत. अशा विपरित परिस्थितीत सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण तरी येणार कसे, हा प्रश्न उभा ठाकतो. हे दुष्टचक्र मोडण्यासाठी पोलिसांनी आपल्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/Gt8TRQAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬