[ahmednagar] - जेऊर सोसायटीत एक कोटींचा गैरव्यवहार जेऊर

  |   Ahmednagarnews

सचिवासह संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

म. टा. वृत्तसेवा, नगर

जेऊर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सेवा संस्थेत १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत १ कोटी १८ लाख ५४ हजार १४४ रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी सेवा संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, सचिवावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश नगर तालुका सहकारी संस्थांचे उपनिबंधक आर. बी. कुलकर्णी यांनी दिले आहेत. जिल्हा बँकेचे शाखाधिकारी, तपासणी अधिकारी यांनीही अहवाल तपासणीत हलगर्जीपणा केल्याचा ठपका चौकशी अहवालात नमूद केला आहे.

जेऊर सेवा संस्थेच्या चौकशी अहवालात गंभीर आक्षेप नोंदवत मुद्दे मांडण्यात आले आहेत. जिल्हा बँकेच्या शाखाधिकाऱ्यांनी संस्थेच्या दप्तराची तपासणी करताना सचिवाने दिलेल्या चुकीच्या आर्थिक पत्रकावरून तपासणी केली. बँकेच्या वरिष्ठ कार्यालयावरही संस्थेच्या दप्तर दिरंगाई, अनियमिततेबाबत वेळीच दखल घेऊन उपाययोजना केल्या नसल्याचे ताशेरे ओढले आहेत. बँक व्यवस्थापनाने संस्थेच्या संगणकीय कामकाजात दोष, त्रुटी, उणीवांबाबत योग्य ठोस धोरणांचा अवलंब केला नाही. संस्थेचे सदोष संगणकीय कामकाज सुरू ठेवले. त्यामुळे १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत सभासदांनी संस्थेस कर्जापोटी १ कोटी १८ लाख ५४ हजार १४४ रुपयांचा रोख भरणा केला. मात्र सचिवाने ही रक्कम बँकेत न भरता त्याचा अपहार केला. सुपरवायझिंग फेडरेशन तपासणी अधिकारी यांनीही संस्थेच्या दप्तराची प्रत्यक्ष तपासणी करताना संस्था सचिवाने सादर केलेल्या चुकीच्या आर्थिक पत्रकावरून तपासणी केली. त्यांनी संस्थेच्या संपूर्ण दप्तराची तपासणी न करताच अपूर्ण अहवाल दिला. फेडरेशन तपासणी अधिकाऱ्याने संस्थेच्या निधीचा गैरव्यवहार वेळीच निदर्शनास आणून दिला नाही. तपासणी कालावधीत संस्थेने ठरावान्वये नियुक्त केलेले संबंधित लेखापरीक्षक यांनीही लेखापरीक्षकाची जबाबदारी व कर्तव्य योग्यरित्या पार पाडले नाही. तपासणी कालावधीत संस्थेच्या सचिवाने पदाचा दुरुपयोग करून संस्थेच्या निधीचा गैरवापर केला. संस्थेचे तत्कालीन पदाधिकारी, संपूर्ण संचालक मंडळाने सचिवाचा गैरव्यवहार वेळीच रोखला नाही. गैरव्यवहाराची भरपाई करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करून रकमेची वसुली केलेली नाही. त्यामुळे संस्थेच्या आर्थिक नुकसानीस संस्थेचे सचिव व तत्कालीन संचालक मंडळ, पदाधिकारी यांना जबाबदार धरण्यात आल्याचे अहवालात नूद केले आहे. संस्थेतील गैरव्यवहाराच्या सर्व बाबींची चौकशी करून आर्थिक नुकसानीस जबाबदार असलेल्या व्यक्तींकडून रक्कम वसूल करण्यासाठी चौकशी अधिकारी म्हणून श्रीगोंदे येथील सहायक निबंधक आर. ए. खेडकर हे सहा महिन्यांत चौकशी अहवाल सादर करणार असल्याचे सहकार विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/a8qWCAAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬