[jalgaon] - आमदार राम कदमांचा निषेध

  |   Jalgaonnews

राष्ट्रवादी महिला आघाडीकडून प्रतीकात्मक पुतळा दहन

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

मुंबर्इतील घाटकोपर येथील कार्यक्रमात भाजपचे आमदार राम कदम यांनी महिलांबद्दल केलेल्या वक्तव्याचा जळगाव राष्ट्रवादी महिला आघाडीकडून बुधवारी तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. मू. जे. महाविद्यालयासमोर आमदार कदम यांचा प्रतीकात्मक पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पुतळा जप्त केला.

मुंबईत मुलींच्या अपहरणाच्या घटनेत लक्षणीय वाढ झाली असताना एका आमदाराने अशाप्रकारे वक्तव्य करून समस्त महिला वर्गाचा अपमान केल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. भाजप सरकार स्वतःला संस्कृती रक्षक समजते आणि त्यांचेच आमदार, मंत्री महिलांबाबत बेताल व लाजविणारे वक्तव्य करतात यावरून त्यांची मानसिकता लक्षात येते, असा आरोपही यावेळी आंदोलक मंहिलांनी केला.

पुतळ्याला चपलांचा हार

या प्रसंगी महिलांनी निदर्शने करीत, घोषणा देत, राम कदम यांच्या पुतळ्याला चप्पलचा हार व हातात बांगड्या भरून पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनात अध्यक्ष कल्पना पाटील, सविता बोरसे, मीनाक्षी चव्हाण, लता बाविस्कर, जिल्हा उपाध्यक्ष नीला चौधरी, ममता तडवी, अर्चना कदम, शकुंतला धर्माधिकारी, माया बारी, सोनाली देऊळकर, आशा येवले, रजनी पाटील, मीनाक्षी टेकम, प्रतिभा पाटील यांच्यासह महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/SdLZEAAA

📲 Get Jalgaon News on Whatsapp 💬