[navi-mumbai] - वाहतूक पोलिसाचा रस्ते अपघातात मृत्यू
तळोजातील पहाटेची घटना
म. टा. वृत्तसेवा, पनवेल
कल्याण-पनवेल बायपासवरील वाहतूककोंडी फोडून वाहतूक सुरळीत करून वाहतूक चौकीकडे परतणाऱ्या वाहतूक पोलिसाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. तळोजा वाहतूक शाखेत काम करणाऱ्या या वाहतूक पोलिसांचे नाव अतुल गागरे असे असून ते ३३ वर्षांचा आहे. वाहतूक पोलिसाचा रस्ते अपघातात झालेल्या मृत्युमुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
तळोजा वाहतूक शाखेत पोलिस शिपाई म्हणून काम करणारे अतुल गागरे मंगळवारी रात्रपाळीसाठी आले होते. तळोजा एमआयडीसीतून येणाऱ्या कल्याण-पनवेल महामार्गावर नागझरी गावाच्या पुढे नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या ठाण्याकडील हद्दीजवळ अवजड वाहनांची कोंडी झाल्याची माहिती आयुक्तालयाकडून त्यांना मिळाला होती. ही कोंडी सोडविण्यासाठी मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास ते तिकडे गेले होते. मुंब्रा बायपासचे काम सुरू असल्यामुळे रात्रीच्या वेळी पनवेल, पुणे, जेएनपीटीकडे येणारी अवजड वाहतूक या अरूंद रस्त्यामार्गे सोडण्यात येत असल्यामुळे वाहनांची वर्दळ वाढते. मंगळवारी रात्रपाळीसाठी तळोजा वाहतूक शाखेत केवळ तीन कर्मचारी होते. कंट्रोल रूममधून कॉल आल्यानंतर अतुल गागरे आणि त्यांचे आणखी एक सहकारी कोंडी सोडविण्यासाठी गेले. त्यातील एकजण अलीकडे थांबला आणि अतुल नागझरी गावाच्या दिशेने पुढे गेले. काही वेळाने कोंडी सोडवल्यानंतर अतुल पुन्हा वाहतूक चौकीच्या दिशेने निघाले असता याच मार्गावरील नितळज गावाजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात अवजड वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. २०१२ साली नवी मुंबई पोलिस आयुक्तालयात भरती झालेले अतुल ६५० जणांमधून पहिले आले होते. मूळचा पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथील आनंद वडगावचे अतुल गागरे यांची पत्नीदेखील पोलिस दलात कार्यरत असून त्यांना दोन वर्षांची मुलगी आहे. नावडे नोड येथे ते वास्तव्यास होते. बुधवारी दुपारी अंत्यसंस्कारासाठी त्यांचा मृतदेह गावाला नेण्यात आला.
येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/wKdglQAA