[kolhapur] - गाळ्यांचे भाडे सीओ, इस्टेटकडून वसूल करा

  |   Kolhapurnews

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

येथील शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पिछाडीस असलेल्या सुमारे २८ दुकानगाळ्यांचे प्रत्येकी दरमहा तीन हजार रुपयांप्रमाणे गेल्या दहा वर्षांतील १२० महिन्यांचे सुमारे एक कोटी ८० हजार रुपयांची रक्कम मुख्याधिकारी व इस्टेट विभागप्रमुखांच्या पगारातून वसूल करण्याची मागणी न्याय निवाडा लोकनेता फाउंडेशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

नगरपरिषदेच्या मालकीचे शहरातील विविध भागात दुकानगाळे आहेत. त्यापैकी शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या मागील बाजूस २८ दुकानगाळे असून, त्यांच्या भाड्यासंदर्भात न्याय निवाडा लोकनेता फाउंडेशनने एप्रिल २०१८ मध्ये माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागविली होती. त्यावर प्रशासनाने पत्राद्वारे मे २०१८ मध्ये दिलेल्या माहितीमध्ये या गाळ्यांचे भाडे नगरपरिषदेकडे जमा होत नसल्याचे सांगिल्याने नगरपरिषदेतील आंधळा कारभार उजेडात आला आहे.

येथील शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या मागे नगरपरिषदेच्या मालकीचे २८ दुकानगाळे आहेत. मात्र, ते नेमके कोणी घेतले व कोण वापरतो हे गुलदस्त्यातच असून, त्याची माहिती नगरपरिषदेकडेही उपलब्ध नाही. यासंदर्भात न्याय निवाडा लोकनेता फाउंडेशनने माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागविली होती. त्यावर नगरपरिषदेने दिलेल्या माहितीने पितळ उघड पडले आहे. याबाबत चौकशीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून त्यामध्ये या दुकानगाळ्यांचे भाडे नगरपरिषदेची एक व्यक्ती येऊन घेऊन जात असल्याचे समोर आले आहे. हे गाळे गेल्या दहा वर्षांपासून अस्तित्वात असून, प्रत्येकी तीन हजार रुपयांप्रमाणे विनापावती हे भाडे वसूल केले जात आहे. मासिक भाडे ८४ हजार रुपये होते. त्यानुसार गेल्या दहा वर्षांत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सुमारे एक कोटी ८० हजार रुपयांचे नगरपरिषदेचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी मुख्याधिकारी व इस्टेट खातेप्रमुख यांना जबाबदार धरुन ही रक्कम त्यांच्या पगारातून वसुल करुन त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी केली आहे. तसेच या प्रकरणी कारवाई न झाल्यास योग्य त्या न्यायालयात दाद मागण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/3bYdoAAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬