[nagpur] - पगार दिवाळीपूर्वीच

  |   Nagpurnews

सरकारी कर्मचाऱ्यांचा जीव भांड्यात

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

दिवाळीपूर्वी पगार काढण्याचा आदेश मध्यंतरी रद्द करण्यात आला होता. लेखा व कोषागार विभागाने निवडणूक काळातील धावपळीचे कारण समोर करून पगार लवकर काढण्यास असमर्थता दर्शविल्याने ही स्थिती ओढवली होती. मात्र, आता २५ ऑक्टोबर अर्थात धनत्रयोदशीपूर्वीच पगार निघणार असल्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.

यंदा २५ ऑक्टोबरपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. सणाची खरेदी आणि इतर खर्चासाठी सरकारी कर्मचाऱ्यांची पंचाईत होऊ नये, यासाठी राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारकांचा ऑक्टोबर महिन्याचा पगार आधीच काढण्यात येणार आहे. सुरुवातीला निवृत्तीवेतनधारकांसह सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे येथील कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीपूर्वी वेतन मिळणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा उत्साहात होणार होती. मात्र, लेखा व कोषागार संचालकांनी हा आनंद हिरावल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. सहसा दर महिन्याच्या १ तारखेला सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार होतो. मात्र, यंदा दिवाळी महिनाअखेरीस आली. २५ ऑक्टोबरपासून दिवाळी असल्यामुळे लवकरच पगार दिला जाणार होता. दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणुकीसाठी मतदान आणि मतमोजणी होणार आहे. त्यामुळे, सरकारी कर्मचाऱ्यांची नाराजी नको, शिवाय त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी आठ दिवस आधीच पगार देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीचे कारण देत लेखा व कोषागार संचालकांनी या आदेशाची अंमलबजावणी करण्यास नकार दिला होता. परंतु, आता हा आदेश मागे घेऊन पगार दिवाळीपूर्वीच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/at3xfAAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬