[aurangabad-maharashtra] - जातीय ध्रुवीकरणात मतपेढीचा शोध

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीत चर्चेत राहिलेल्या शिवस्वराज्य बहुजन पक्षाला घोषित केल्याप्रमाणे कन्नड वगळता इतर मतदारसंघात सक्षम उमेदवार मिळाले नाहीत. कन्नड मतदारसंघात चौरंगी लढत असल्यामुळे विधानसभा निवडणुकीत जनमत वळवण्यासाठी शिवस्वराज्यचे उमेदवार हर्षवर्धन जाधव यांची मोर्चेबांधणी सुरू आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार किशोर पवार यांच्या उमेदवारीने जातीय ध्रुवीकरणाचा फायदा मिळण्याची शक्यताही मावळली आहे.

कन्नड विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत होणार आहे. शिवसेनेचे उदयसिंग राजपूत, राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष कोल्हे, अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव, भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार किशोर पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मारुती राठोड प्रमुख उमेदवार आहेत. आठ उमेदवार रिंगणात असून चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत जातीय ध्रुवीकरणाचा शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना फायदा झाला होता. कन्नड मतदारसंघात विधानसभेला उदयसिंग राजपूत व संतोष कोल्हे यांच्यात ओबीसी मतांचे विभाजन होऊन मराठा मतपेढी फायदेशीर ठरेल, असा जाधव समर्थकांचा दावा होता. मात्र, किशोर पवार यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे मराठा मतविभाजन होणार असल्याने जाधव समर्थकांची कोंडी झाली आहे. वंचित बहुजन आघाडीने ऐनवेळी उमेदवार बदलत मारुती राठोड यांना उमेदवारी दिली. राठोड यांनी बंजारा समाजाच्या माध्यमातून मोर्चेबांधणी केली आहे. बहुसंख्य बंजारा मते राठोड यांना मिळण्याची शक्यता आहे. एमआयएमने उमेदवार दिला नसल्याने बहुसंख्य मुस्लिम मतदार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार संतोष कोल्हे यांच्याकडे वळण्याची शक्यता आहे. कन्नड नगरपालिकेचा दशकभराचा अनुभव असलेले कोल्हे शहरातील मते खेचण्याच्या रणनीतीत तरबेज असल्याने इतर उमेदवारांची अडचण झाली आहे. शिवसेनेचा परंपरागत मतदार आणि ओबीसी मतदार राजपूत यांच्यामागे राहणार आहे. या पार्श्वभूमीवर जाधव हक्काच्या मतदारांच्या शोधात मोर्चेबांधणी करण्याची शक्यता आहे. सध्यातरी कन्नड मतदारसंघातील लढत उत्कंठावर्धक ठरली आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/wRSU8wAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬