[navi-mumbai] - महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण करणारा अटकेत

  |   Navi-Mumbainews

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

वीजचोरी करणाऱ्या ग्राहकाचे वीजमीटर काढून नेणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याची घटना सोमवारी दुपारी शिरवणे भागात घडली. सुनील जोशी असे मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून नेरूळ पोलिसांनी त्याच्यावर सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तक्रारदार नंदकिशोर भारती हे महावितरणच्या नेरूळ विभागात तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.

वीजचोरी करणाऱ्या व्यक्तींनी कम्पाऊंडेबल चार्जेस भरले नसल्यास त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश असिस्टण्ट इंजिनीअर भानुशाली यांनी नंदकिशोर भारती यांना दिले होते. शिरवणे परिसरात राहणारे एम. के. चवरकर यांच्यावर दोन महिन्यांपूर्वी वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच, त्यांचे वीजमीटर काढून नेण्यात आले होते. त्यामुळे महावितरणचे कर्मचारी नंदकिशोर भारती हे सोमवारी सकाळी ११च्या सुमारास चवरकर यांच्या घरी कम्पाऊंडेबल चार्जेस भरले की नाही, याची माहिती घेण्यासाठी गेले होते. यावेळी चवरकर यांनी ते भरले नसल्याचे तसेच मुलाच्या वीजमीटरमधून वीजजोडणी घेतल्याचे आढळून आले. त्यामुळे नंदकिशोर भारती यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चवरकर यांच्या मुलाच्या नावावर असलेले वीजमीटर काढून आणले. दुपारी नंदकिशोर भारती हे दुसऱ्या कामासाठी शिरवणे भागात गेले असताना, सुनील जोशी नामक व्यक्तीने त्यांना अडवून चवरकर यांच्या मुलाच्या घरातील वीजमीटर काढून आणल्याबाबत जाब विचारला. यावर नंदकिशोर भारती यांनी वरिष्ठांच्या आदेशाने हे मीटर काढण्यात आल्याचे सांगून त्यांच्याकडे विचारणा करण्यास सांगितल्यानंतर सुनील जोशी याने नंदकिशोर भारतीय यांची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की करून मारहाण केली. तसेच, यापुढील काळात कुणाचे वीजमीटर काढल्यास बघून घेण्याची धमकी दिली. यावेळी नागरिकांनी नंदकिशोर भारती यांची सुटका केली. त्यानंतर भारती यांनी नेरूळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार नेरूळ पोलिसांनी सुनील जोशी याच्या विरोधात सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला रात्री अटक केली. न्यायालयाने त्याची दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली.

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/thl8MgAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬