[aurangabad-maharashtra] - गळा चिरला; आरोपीला अटक, पोलिस कोठडी

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रोडवर गाडी उभी केल्याच्या कारणावरुन झालेल्या वादानंतर तरुणाचा गळा वस्तऱ्याने चिरुन गंभीर जखमी करणारा आरोपी श्याम शंकर गंगातिरे याला गुरुवारी (१४ फेब्रुवारी) अटक करुन कोर्टात हजर केले असता, आरोपीला शनिवारपर्यंत (16 फेब्रुवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी दिले.

प्रकरणात जखमी शेख अरबाज याचे वडील शेख अब्दुल शेख मखबुल पटेल (४७, रा. माणिकनगर, नारेगांव) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, ११ फेब्रुरवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शेख अरबाज हा घराजवळ गाडी घेऊन उभा होता. त्यावेळी आरोपी श्याम शंकर गंगातिरे (२२, रा. माणिकनगर, नारेगाव) व त्याच्या सोबत सचिन अंभोरे, सिचन जैस्वाल, वाघ व आणखी एकजण तिथे आले. त्यांनी अरबाजला 'रोडवर गाडी का उभी केली, तुझ्या बापाचा रस्ता आहे का' असे म्हणत अरबाजसोबत वाद घातला. मात्र काही वेळाने वाद निवळला. १३ फेब्रुवारी रोजी दुपारी पावणेतीनला अरबाजचे वडील शेख अब्दुल यांना फोन आला व अरबाज याला गंगातिरे याने वस्तऱ्याने जखमी केल्याचे सांगण्यात आले. माहिती मिळताच शेख अब्दुल यांनी धाव घेत अरबाजला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करुन आरोपी गंगातिरे याला गुरुवारी अटक करुन कोर्टात हजर केले असता, आरोपीने गुन्हा कोणत्या हेतुने केला याचा तपास करणे बाकी असून, आरोपीला कोणी मदत केली, त्याचे साथीदार कोण आहेत, याबाबत तपास करणे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील नितीन ताडेवार यांनी केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीला १६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/Mg_aIAAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬