[nagpur] - ‘खरी पत्नी मीच’; दोघींच्याही दाव्याने आमदारांसमोर पेच!

  |   Nagpurnews

म.टा. वृत्तसेवा, यवतमाळ

आर्णीचे भाजप आमदार राजू तोडसाम यांच्या दोन पत्नींमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेचा व्हीडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यातच 'आमदार तोडसाम यांची खरी पत्नी मीच', असा दावा त्यांच्या दोन्ही पत्नींकडून करण्यात येत असल्याने, 'आमदार राजू तोडसाम कोणाचे' असा 'वाद' पांढरकवडा शहरात चर्चेत रंगू लागला आहे.

आमदार तोडसाम यांच्या पहिल्या पत्नी अर्चना या शिक्षिका असून त्या सासू (तोडसाम यांच्या आई) व दोन मुलांसह पांढरकवडा येथे राहतात. चुडासाम हे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र घेताना त्यांच्यासोबत अर्चना होत्या. त्यानंतर आर्णी येथील प्रिया शिंदे त्याच्या जीवनात आली. गुरुवारी अर्चना यांनी 'राजू तोडसाम यांच्याबरोबर १७ वर्षांपूर्वी आपला विवाह झाला होता. आपल्याला दोन मुले आहेत. इतकी वर्षे संसार सुरळीत सुरू असताना प्रियाने त्यांना आपल्या नादी लावले. तेव्हापासून आपल्या पतीने घरी येणे सोडले. प्रिया ही पैशासाठी त्यांच्या मागे आहे. तिच्यापासून आमदार चुडासाम यांना धोका आहे. पण याचे त्यांना भान त्याला नाही', असे सांगीतले. आमदार राजू तोडसाम यांनी, 'मी पहिल्या पत्नीला फारकत दिली असून त्यानंतरच प्रियाशी लग्न केले आहे. आता आमदार झाल्यामुळे मला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे', असे सांगितले. तर, त्यांच्या दुसऱ्या पत्नी प्रिया यांनी, 'आमदार चुडासाम यांनी पहिल्या पत्नीला कायदेशीर फारकत दिल्याची कागदपत्रे माझ्याजवळ आहेत. त्यामुळे मी त्यांच्याशी लग्न केले. असे असताना काही जणांनी गोंधळ घालून मला मारहाण केली व बदनाम करण्याचा प्रयत्न केला. याची तक्रार मी पोलिस स्टेशनमध्ये करणार आहे', असे सांगितले. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत असताना मात्र, अद्याप कोणाचीही तक्रार पोलिसांना प्राप्त झाली नसल्याचे पांढरकवडाच्या पोलिस निरीक्षकांनी सांगितले.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/VCyJNwAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬