[akola] - राज्यातील शाळांकडून भौतिक सुविधांची माहिती मागविली!

  |   Akolanews

अकोला: शासनाच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार योजना राबविण्यात येते. या योजनेसाठी २0१९-२0 या वर्षाचे वार्षिक कार्य आणि अंदाजपत्रक केंद्र शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. त्या दृष्टिकोनातून राज्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा स्तरावर असलेल्या भौतिक सुविधांची माहिती मागविण्यात आली आहे. ही माहिती एमडीएम पोर्टलमध्ये अद्ययावत करून शाळांनी पाठविण्याचे आदेश शालेय पोषण आहार योजनेचे राज्य समन्वयक दिनकर टेमकर यांनी दिले आहेत.

शाळा मुख्याध्यापकांनी शाळेत कोणकोणत्या भौतिक सुविधा उपलब्ध असल्याची माहिती प्रमाणित करून सादर करावी आणि तालुका स्तरावरील माहितीसुद्धा एमडीएम पोर्टलवर अद्ययावत करून २0 एप्रिलपर्यंत ही माहिती द्यावी. मुख्याध्यापकांनी शाळेतील भौतिक सुविधांची वस्तुस्थिती व अचूक माहिती सादर करावी. कोणत्याही प्रकारची खोटी माहिती खपवून घेतल्या जाणार नाही. शाळेमधील स्वयंपाकगृह, त्याचा प्रकार, स्वयंपाकगृह नसल्यास बांधकामासाठी उपलब्ध जागा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, हात धुण्याची सुविधा, ताटांची संख्या, तांदूळ व धान्यादी माल साठवणुकीसाठी धान्य कोठ्या, एलपीजी गॅस कनेक्शन, परस बाग, अग्निशमन यंत्रणा, शौचालयाची सुविधा अन्न शिजविणारी यंत्रणा, योजनेस पात्र विद्यार्थी संख्या, शाळा, व्यवस्थापन समिती, एसएमसी बैठकांची संख्या आदी भौतिक सुविधांची माहिती शाळांकडून मागविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

फोटो - http://v.duta.us/DNyUdgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/az9PjwAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬