[nagpur] - आहार, विचार जगातली सर्वोत्तम सौंदर्य प्रसाधने

  |   Nagpurnews

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

निसर्गाने प्रत्येकाला जशी वेगवेगळी शरीररचना दिली आहे तसेच निर्मळ मनही दिले आहे. जगाच्या पाठीवरील कोणतीही वस्तू शरीराला कृत्रिम सौंदर्य देऊ शकत नाही. बेगडी सौंदर्याच्या नावाखाली जाहिरातींचा मारा करीत केवळ आपल्या वस्तू खपवून गडगंज पैसा कमावणाऱ्या कंपन्यांनी रचलेले हे कुभांड आहे. त्यामुळे मनाचे सौंदर्य उजळवा आणि या मायाजालात अडकून वस्तुंचे गुलाम होऊ नका, असा आरोग्य मंत्र देत रविकिरण महाजन यांनी रविवारी संवेदनशील नागपुरकरांना आरसा दाखविला.

चैत्र गौरीस्थापना निमित्त योगाभ्यासी मंडळाच्यावतीने आयोजित सौंदर्य प्रसाधनांचा कुरुप चेहरा या आगळ्या वेगळ्या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी महाजन यांनी याविषयावर प्रकाश टाकला. रामनगर येथील योगाभ्यासी मंडळात जनार्दन स्वामींच्या समाधीस्थळावरील सभागृहात हा कौटुंबिक कार्यक्रम घेण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ खांडवे अध्यक्षस्थानी होते. अवास्तव औषध घेण्याची पद्धत शरिराला विषारी घटकांनी भरत आहे, असे नमूद करीत महाजन म्हणाले, पॅसिफिक समुद्राच्या तळाशी अलिकडेच शास्त्रज्ञांनी संशोधन केले असता तिथे त्यांना प्लास्टिकचे सुक्ष्म अंश मिळाले. सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापरलेल्या रसायनांच्या माध्यमातून हे अंश समुद्राच्या तळाशी गाडले जात आहेत. जे प्लास्टिक कधीच नष्ट होऊ शकत नाही, ते पुन्हा कुठल्या ना कुठल्या स्वरुपात मनुष्याच्या शरिरात जात आहेत. आजवर जगाच्या पाठीवर ८५ हजार प्रकारच्या रासायनिक घटकांचा शोध लागला आहे. त्यापैकी १०,५०० प्रकारची घातक रसायने सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापरली जातात. ती नवजात शिशूंच्या आरोग्यासाठीही घातक ठरतात. मेंदूत वाढत जाणारी विषारी द्रव्ये ही जगातल्या वैद्यकशास्त्रासमोरचे सर्वांत मोठे आव्हान ठरत आहे. सौंदर्याची कल्पना ही वस्तू आणि बाजारूपणावर अवलंबून होत असल्याने घोळ वाढत आहे. सात्विक आहार आणि भेसळमुक्त विचारांमध्ये खरे सौंदर्य असते, याचा त्यामुळे विसर पडत चालला आहे. बेगडी सौंदर्याला भुलून आपण बाजारू वस्तुंचे गुलाम होत चाललो आहोत. नसलेल्या विश्वाची भूरळ पाडत निसर्गाने दिलेल्या सौंदर्याची अशी अवहेलना करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/XCcBmAAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬