[thane] - ठाण्यात सलग दोन दिवस विजेचा लपंडाव

  |   Thanenews

ऐन उन्हाळ्यातील बत्तीगुलमुळे रहिवासी हैराण

म. टा. प्रतिनिधी, ठाणे

ठाण्यातील नौपाडा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. विशेष म्हणजे शनिवारी सलग चार तास वीज नसल्यामुळे इन्व्हर्टरची क्षमता संपून नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागला. वीजपुरवठा खंडित होण्याचा हा प्रकार रविवारी दिवसभर सुरू होता. दहा मिनिटे ते चाळीस मिनिटे इतका वीजपुरवठा खंडित होण्याचा कालावधी होता. उन्हाळा असल्यामुळे मागणी वाढल्यामुळे तांत्रिक अडथळा उद्भवत असल्याची शक्यता महावितरणकडून व्यक्त करण्यात आली आहे. परंतु निवडणुकांच्या तोंडावर सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक संतप्त झाले होते.

ठाण्याचे तापमान वाढल्यामुळे उन्हाळ्यापासून रक्षण करण्यासाठी पंखे, कुलर, फ्रिज आणि एसीचा वापर वाढला असून त्यामुळे विजेची मागणीही वाढली आहे. त्यातच शनिवार आणि रविवारी ठाणे शहरामध्ये ठिकठिकाणी सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. शनिवारी सुमारे चार तास वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागिरकांना मोठा फटका सहन करावा लगला. यावेळी इन्व्हर्टरचा बॅकअपही संपल्यामुळे उकाड्याचा सामना करावा लागत होता. रात्रीही काहीवेळा वीजपुरवठा खंडित झाला होता. रविवारीही वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्यामुळे नागरिकांकडून तक्रारी केल्या जात होत्या. परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कोणासही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे रहिवाशांचा राग अनावर झाला होता. काही अधिकाऱ्यांनी फोन न उचलल्यामुळे दाद कोणाकडे मागावी, असा प्रश्न निर्माण झाला होता. विशेष म्हणजे कॉल सेंटरमध्ये तक्रार करण्यास फोन केल्यानंतर त्यांना बराच वेळ होल्डवर ठेवले जात होते. अधिकारी फोन उचलत नसल्याची तक्रार नौपाड्यातील नागरिकांनी केली. निवडणुकांच्या तोंडावर सुरू असलेला हा मनस्ताप थांबविण्याची गरज व्यक्त केली जात होती. परंतु महावितरणकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे येथील रहिवासी महेंद्र मोने यांनी स्पष्ट केले.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/LqoAzwAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬