[thane] - मतदार केंद्रांवर सुसज्ज नियंत्रण कक्षाची नजर!

  |   Thanenews

म. टा. प्रतिनिधी, ठाणे

लोकसभा निवडणुकांचे मतदान आज, सोमवारी होत असून या सर्व प्रक्रियेवर नजर ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सुसज्ज नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले असून या मतदानप्रक्रियेवर २४ तास नजर ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवनामध्ये हे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून ते कार्यान्वित करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर या यंत्रणेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यातील मतदार केंद्रांवर लक्ष ठेवणार आहे.

निवडणुकांसाठी यंत्रणा सज्ज झाल्या असून शनिवारी निवडणूक कर्मचाऱ्यांची पथके मतदार साहित्यासह मतदार केंद्रांकडे रवाना झाली आहेत. तेव्हापासून ते मतदान यंत्र स्ट्राँग रूममध्ये जाईपर्यंत संपूर्ण प्रक्रियेवर जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण राहणार आहे. तीनही मतदारसंघाचे नियंत्रण एकाच ठिकाणाहून होणार आहे. यात प्रामुख्याने मतदानप्रक्रिया, सुविधा सेवा, सी व्हिजिल अॅप, १९५० हेल्पलाइन नंबर, जिल्ह्यातील ६७१ मतदान केंद्रांचे वेब कास्टिंग, निवडणूक कामासाठी वापरात असलेल्या वाहनांचे जीपीएस मॉनिटरिंग, तसेच वेळोवेळी करावयाचे सर्वप्रकारचे ऑनलाइन रिपोर्टिंग या सुविधा सज्ज आहेत. १९५० या हेल्पलाइन नंबरवर मतदारांना माहिती देण्यासाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघनिहाय एकूण तीन कॉल सेंटर तयार करण्यात आले आहेत. तसेच, प्रत्येक मतदारसंघनिहाय सर्व बाबींचे सनियंत्रण करण्याची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रनिहाय नेमण्यात आलेले झोनल अधिकारी दर दोन तासाला अपलोड करणारे रिपोर्ट्स, त्यानंतर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी ते जिल्हा निवडणूक अधिकारी या प्रक्रियेत समाविष्ट असतील. ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राज्य निवडणूक यंत्रणेशी जोडलेली असेल. या सर्व प्रक्रियेवर उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी यांच्यासह तहसीलदार नागोराव लोखंडे, अर्चना कोळी, तीन नायब तहसीलदार रोहिदास चौधरी, राजश्री पेडणेकर, मृणाल कदम तसेच सहायक जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी नरेंद्र भामरे यांच्या निरिक्षणाखाली असणार आहेत.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/ldDqjAAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬