[nagpur] - वर्धा शहरावर जलसंकट

  |   Nagpurnews

म. टा. वृत्तसेवा, वर्धा दिवसेंदिवस जलसंकट गडद होत असताना हवामान खात्याने मान्सून लांबल्याचा अंदाज वर्तविला. धाम प्रकल्प सध्या कोरडा पडत चाललाय. आता पाटबंधारे विभाग मृत जलसाठा काढण्याची परवानगी मागत आहे. त्यामुळे पाऊस लांबला तर येणाऱ्या दिवसात मृत जलसाठ्यावरच वर्धेकरांची तहान भागणार आहे. भीषण पाणीटंचाईची झळ सोसणाऱ्या वर्धेकरांना सध्या टँकरचा आसरा घ्यावा लागत आहे. धाम नदी प्रकल्प या प्रकल्पाची ६९.४३५ दलघमी इतकी साठवण क्षमता आहे. त्यापैकी ५९.४८५ दलघमी इतका जिवंत तर ९.९५ दलघमी इतका मृत जलसाठा आहे. यावर्षी अपुऱ्या पावसाने धाम प्रकल्पात पाणीसाठा झाला नाही. या प्रकल्पात केवळ २.८५ दलघमी इतकाच उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. जून महिन्यापर्यंत नियोजनानुसार वर्धेकरांची तहान भागविण्यासाठी आठ दलघमी पाणीसाठा लागणार आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने मृत जलसाठा काढण्याची परवानगी मागितली आहे. शहरासह आजूबाजूच्या गावात भीषण पाणीटंचाई असून या गावातील नागरिकांना टँकरचा आसरा घ्यावा लागत आहे. डिसेंबर महिन्यापासून वर्धा शहराच्या आजूबाजूच्या गावकऱ्यांना पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. सुरुवातीला आठ दिवसाआड, नंतर १५ दिवसाआड पाणीपुरवठा होत होता. जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेले पाण्याचे नियोजन सध्या कोलमडले. अशातच मान्सून लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अडचणीत भर पडली आहे. तीव्र पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गावकऱ्यांना आता टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र पाहिजे त्या प्रमाणात प्रशासनाचे नियोजन नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पिपरीच्या ग्रामस्थ प्रज्ञा झुंझूरकर यांनी प्रशासनाच्या पाण्याच्या नियोजनाला अपयशी ठरवत किमान पुढील काळात पाणी मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/moHEbwAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬