[thane] - पोलिसांमुळे वाचला जीव

  |   Thanenews

म. टा. प्रतिनिधी, ठाणे

स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या रक्षणासाठी धावून जाणाऱ्या पोलिस दलाची मान ठाणे पोलिसांमुळे पुन्हा एकदा उंचावली आहे. सीपीआर प्रशिक्षण घेतलेल्या गस्तीवरील पोलिसांना मोटारसायकलवरून खाली पडलेला एक व्यक्ती दिसला. पोलिसांनी वेळ न दवडता तात्काळ छातीवर दाब देऊन या व्यक्तीला शुद्धीवर आणत त्याचे प्राण वाचवले असून अंबरनाथ पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

अंबरनाथ पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक उल्हास जाधव, पोलिस नाईक संदीप फडतरे, गायकवाड गुरुवारी सायंकाळी अंबरनाथ परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी कल्याण-बदलापूर मार्गावरील राहुल किराणा स्टोअर्सजवळ ४० ते ४५ वयोगटातील एक व्यक्ती मोटारसायकलवरून चक्कर येऊन खाली पडल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या व्यक्तीच्या तोंडातून फेस येत होता. तसेच, हा व्यक्ती बेशुद्ध पडला होता. या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता होती. पोलिस उपनिरीक्षक जाधव यांनी सीपीआर प्रशिक्षण घेतले असल्याने त्यांनी १० ते १५ मिनिटे दाब देऊन या व्यक्तीला शुद्धीवर आणले आणि पुढील उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले. पोलिस पथकाने प्राथमिक स्वरूपात उपचार केल्याने या व्यक्तीचे प्राण वाचले आहेत. अधिक चौकशीअंती या व्यक्तीचे नाव राजेंद्र नामदेव पांढरे (४५, रा. मातोश्रीनगर, अंबरनाथ) असल्याची माहिती पुढे आली. पांढरे यांच्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनीही रुग्णालयात धाव घेतली. सीपीआर प्रशिक्षणामुळे एका व्यक्तीचा जीव वाचल्याने हे प्रशिक्षण किती महत्त्वपूर्ण आहे, हे सिद्ध झाले आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/0b7aZAAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬