[ahmednagar] - माहेरी जा...सुवासाची कर बरसात...

  |   Ahmednagarnews

सासूरवाशिणींनी दिली पूरग्रस्त माहेराला मदत

म. टा. प्रतिनिधी, नगर

कोल्हापूर, सांगली व सातारा परिसरात माहेर असलेल्या नगरच्या काही सासूरवाशिण महिलांनी आधी पुरामुळे व आता आजारपणामुळे हैराण झालेल्या माहेरच्या मंडळींना तब्बल साडेतीन ते चार लाखांची औषधे शनिवारी येथून पाठवली. या वेळी त्यांचे डोळे भरून आले होते. 'घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात...माहेरी जा सुवासाची कर बरसात'...या गायिका सुमन कल्याणपूरकर यांच्या प्रसिद्ध गीताच्या ओळी उपस्थितांच्या मनात दाटून आल्या. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे नियोजन येथील जाएंटस ग्रुपने केले होते.

सांगली व कोल्हापूर परिसरातील पूरस्थिती आटोक्यात आली असली तरी आता तेथे डेंगी, मलेरिया, गोचीड ताप व अन्य आजाराने त्रस्त असलेल्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे येथील जाएंटस इंटरनॅशनलचे संचालक संजय गुगळे यांनी केमिस्ट असोसिएशन, उद्योजकांची आमी संघटना, आयुर्वेद औषध विक्रेते संघटना, मानस मंदिर व रेणुका रेसिडेन्सी आदी संस्थांच्या मदतीने अन्य विविध आजारांवरील सुमारे साडेतीन ते चार लाखाची औषधे संकलित केली. विवाहानंतर नगरच्या कायमस्वरुपी रहिवासी झालेल्या पण सांगली-कोल्हापूर परिसरात माहेर असलेल्या महिलांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. सांगलीचे माहेर असलेल्या हेमलता टेंबेकर, इस्लामपूरच्या असलेल्या प्रमिला शहा, कोल्हापूरच्या अंजू कुलकर्णी, कऱ्हाडच्या काळोखे यांचा सहभाग विशेष होता. य़ाशिवाय सातारा येथे सासर असलेल्या व नगरला माहेर असलेल्या भावना मोहित कटारिया-गुगळे यांनीही आई नूतन गुगळे यांच्या मदतीने साताऱ्याच्या ग्रामीण भागातील पूरग्रस्तांसाठी मदत पाठवली. औषधांसह ३०० कुटुंबांसाठी किराणा साहित्य, नवे कपडे, ड्रेस व साड्या तसेच लहान मुलांचे कपडे, पाळीव जनावरांसाठी औषधे, दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळून सुमारे ६ लाख रुपये किमतीचे साहित्य पाठवले. स्वतः संजय गुगळे यांच्यासह अनिल गांधी, अभय मुथा, डॉ. विनय शहा, प्रणव गांधी, संदीप धोका, राजू झंवर, किरण बोथरा आदी मंडळी हे साहित्य घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील कौठे गाव (ता. पन्हाळा), कुरुंदवाड तसेच सांगली जिल्ह्यातील मांजरेवाडी व टाकळवाडीकडे रवाना झाले. या वेळी नगरसेवक गणेश भोसले, मर्चंटस बँकेचे संचालक संजय चोपडा, नगर अर्बन बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी, केमिस्ट असोसिएशनचे सुधीर लांडगे, आमी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया तसेच हिरालाल चंगेडे, प्रकाश कटारिया, मोनिका गांधी, रेणुका कुलकर्णी, कमलबाई गुगळे आदींनी आवर्जून उपस्थित राहून उपक्रमाचे कौतुक केले.

फोटो - http://v.duta.us/VwlWGAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/yBkZEQAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬