[aurangabad-maharashtra] - फक्त २० टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी !

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'राज्य सरकारची शेतकरी कर्जमाफी योजना फक्त प्रचारापुरती आहे. दोन वर्षांनंतरही जेमतेम २० टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. या लाभार्थ्यांना चालू वर्षात पीक कर्ज नाकारण्यात आले. मराठवाड्यात दुष्काळाचे सावट असून रोजगार, चारा आणि पाणीप्रश्न गंभीर आहे. या मुद्द्यांवर जनतेशी संवाद साधण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे', अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा स्थगित करण्यात आली होती. ही यात्रा १९ ऑगस्टपासून पुन्हा सुरू होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असलेल्या विधानसभा मतदारसंघात शिवस्वराज्य यात्रा निघणार आहे. याबाबत राष्ट्रवादी भवन येथे शनिवारी पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी यात्रेची माहिती सांगितली. 'राज्यात पूरस्थिती असताना मराठवाड्यात दुष्काळाचे सावट आहे. जनावरांचा चारा, पिण्याचे पाणी व रोजगाराचा प्रश्न उभा आहे. तब्बल ७५ टक्के शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. कर्जमाफीची घोषणा झाली तरी दोन वर्षात जेमतेम २० टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती आहे. पण, राष्ट्रीयकृत बँकांकडे ठोस आकडेवारी नाही. जिल्ह्यातील २६ चारा छावण्या जुलै महिन्यात बंद करण्यात आल्या आहेत. या छावण्या तातडीने सुरू करण्याची गरज आहे. जायकवाडी धरणात पाणी असले तरी इतर प्रकल्प कोरडे आहेत. या प्रश्नांवर शिवस्वराज्य यात्रेत संवाद साधला जाणार आहे, असे पाटील यांनी सांगितले. शिवस्वराज्य यात्रा ८० मतदारसंघात फिरणार असून मराठवाड्यातील १७ मतदारसंघाचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे. राज्य सरकारच्या धोरणाबद्दल जनतेच्या मनात रोष असून निवडणुकीत त्याचे पडसाद उमटतील असे पाटील म्हणाले. यावेळी पैठण तालुकाध्यक्ष अप्पासाहेब निर्मळ, शिवाजीराव गावंडे, जयमालसिंग रंधवा, अनिल फड, प्रल्हाद निर्फळ, विलास लिपाणे, रवींद्र माहूरकर, प्रवीण देसरडा उपस्थित होते....

फोटो - http://v.duta.us/eEAIqAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/rqw8ngAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬