घरोघरी गौराईचे आगमन

  |   Sanglinews

सांगली : प्रतिनिधी

कुटुंबात सुखशांती, समृद्धी आणि भरभराट येऊ दे, अशी प्रार्थना करीत गुरूवारी घरोघरी गौरींचे स्वागत करण्यात आले. महिलांनी मोठ्या उत्साहात गौराईचे स्वागत केले. गौराई सोन्याच्या पावलांनी घरी आणण्याचा कार्यक्रम शहराबरोबरच जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने थाटात पार पडला.

झिम्मा-फुगडीच्या तालावर कृष्णा नदीवरून वाजत- गाजत गौरी घेऊन आलेल्या माहेरवाशिणींसह मुलींचे औंक्षण करण्यात आले. सुवासिनींनी देव्हार्‍यावर गौरी विराजमान केल्या.

दुपारनंतर मुखवट्यासह सजलेल्या गौरी उभारण्यासाठी गृहिणींचा उत्साह विशेष होता. दागिन्यांनी मढलेल्या गौरीला भाजी- भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला.

सकाळपासूनच गौरी आणण्यासाठी महिला व मुलींनी सरकारी घाटावर गर्दी केली होती. भरजरी साड्या नेसून लहान मुलींपासून ते महिलांपर्यंतचा उत्साह होता.

काही ठिकाणी पारंपरिक वाद्यांच्या निनादात गौरीची मिरवणूक काढली. दुपारनंतर गौरी घेण्यासाठी एकच झुंबड उडाली. सजवलेल्या गौरी उभारल्यानंतर त्यांचे पूजन करण्यात आले. गौरींसाठी फराळाचे ताट मांडण्यात आले. खणा-नारळाची ओटी तिच्यासमोर ठेवण्यात आली.

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/Arrival-gouri-of-all-home-in-sangli/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Sangli/Arrival-gouri-of-all-home-in-sangli/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬