[Aurangabad-Maharashtra] - औरंगाबादः ६१ लाखांचा ‘आदर्श’ घोटाळा

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादः पतसंस्थेत मुदत ठेव ठेवणाऱ्या विधवा महिलेच्या ६१ लाख रुपयांच्या रकमेचा गैरव्यवहार केल्याचा प्रकार टी. व्ही. सेंटर येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेत उघड झाला आहे. फेब्रुवारी २०१८ ते जुलै २०१९ या कालावधीमध्ये हा प्रकार घडला असून, याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून सिडको पोलिस ठाण्यात पतसंस्थेचे संचालक मंडळ, व्यवस्थापक, कर्मचाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार ३९ वर्षांची महिला एसटी कॉलनी भागातील रहिवासी असून, त्यांचा पती पाटबंधारे विभागात नोकरीला असताना त्यांचे २०११मध्ये निधन झाले. पतीच्या निधनानंतर आलेली रक्कम त्यांनी आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या खात्यात ठेवली होती. यावेळी बँकेचे व्यवस्थापक तसेच अध्यक्ष अंबादास मानकापे यांनी या महिलेला व तिच्या आईला विश्वासात घेऊन पतसंस्थेत मुदत ठेव ठेवल्यास आकर्षक व्याजदर देण्याचे आमिष दाखवले. यामुळे या महिलेने वेगवेगळ्या टप्प्यात एकूण ६१ लाख रुपये मुदत ठेव बँकेत जमा केली. यानंतर या महिलेने पतसंस्थेत जावून मुदतठेवीच्या रकमेबाबत विचारपूस केली असता त्यांना संचालक आणि कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर त्यांना बँकेतून तुमच्या 'एफडी'च्या पावत्या ह्या संगणकातून प्रिंट काढलेल्या नसून, हाताने लिहिलेल्या असल्याचे सांगत त्या बनावट असल्याची माहिती देण्यात आली. बँकेचे संचालक, व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांनी बनावट कागदपत्रे तयार करीत, खोटा हिशेब तयार करून ६१ लाख रुपयांच्या रकमेचा गैरव्यवहार केल्याचे महिलेच्या लक्षात आले. या महिलेच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक अंबादास मानकापे, देविदास अधाने, व्यवस्थापक रवींद्र पुराणिक, कर्मचारी अनिता खनसे आणि बाळू व्यव्हारे यांच्यासह इतरांविरुद्ध फसवणूक, गैरव्यवहार, बनावट कागदपत्रे तयार करणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीएसआय आहेर तपास करीत आहेत.

फोटो - http://v.duta.us/KkT1fwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/9em_lgAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬