[Nagpur] - दीक्षाभूमीच्या विकासकामांना लवकरच मिळणार मान्यता

  |   Nagpurnews

म.टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर

उपराजधानीतील दीक्षाभूमीच्या विकासासाठी आखण्यात आलेल्या आराखड्याला ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात येत असून त्यासाठी २८१ कोटींची तरतूद करण्यता येणार आहे, अशी हमी राज्य सरकारने मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाला दिली.

दीक्षाभूमीच्या प्रस्तावावर बुधवारी होणाऱ्या बैठकीतच मान्यता देण्यात येणार होती. परंतु, मुंबईतील पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीकडे बघता आता राज्य मंत्रिमंडळाची बैठक आता सोमवार, ९ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यावेळी त्या प्रस्तावावर निर्णय घेण्यात येणार आहे. तेव्हा निर्णयाची माहिती सादर करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात यावी, अशी विनंतीही राज्य सरकारने हायकोर्टाला केली.

दीक्षाभूमीचा विकास करण्यात यावा, अशी विनंती करणारी जनहित याचिका अॅड. शैलेश नारनवरे यांनी हायकोर्टात दाखल केली. त्यावर न्या. रवी देशपांडे आणि न्या. विनय जोशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यापूर्वी राज्य सरकारने दीक्षाभूमीच्या विकासासंदर्भात शपथपत्र दाखल केले होते. त्यानुसार, दीक्षाभूमी विकासाचा आराखडा नोएडा येथील डिझाईन असोसिएट्स इनकॉर्पोरेशन या प्रोजेक्ट आर्किटेक्टकडून तयार करण्यात आला आहे. त्यात मुख्य स्तुपाचे विस्तारीकरण, सी गेट कॉम्प्लेक्स, वॉच टॉवर, पार्किंगसाठी बेसमेंट, शौचालये, पिण्याचे पाणी, कार्यक्रम व्यासपीठ, जलसाठा टाकी, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, इत्यादी विकास कामांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात १००.४७ कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. त्यापैकी ४० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील १८१ कोटीच्या कामाचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे एकूण २८१ कोटी रुपयाचे प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित आहेत. याचिकाकर्ते अॅड. नारनवरे यांनी स्वत:च बाजू मांडली. तर महानगर प्राधिकरणतर्फे अॅड. गिरीश कुंटे तर, सरकारतर्फे अॅड. सुमंत देवपुजारी यांनी बाजू मांडली.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/S6AT1AAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬