[Nashik] - अॅब्युलन्सला वाट देणे मोठे पुण्यच!

  |   Nashiknews

'१०८'वरील पायलटची भावना

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जीव धोक्यात असेल तेव्हाच आम्ही घाई करतो. रुग्णांना घेण्यासाठी जाताना किंवा रुग्णांना घेऊन येताना वेळ फारच महत्त्वाची असते. पण, बेशिस्त वाहनचालकांना याच्याशी काही नसते. दुसऱ्याच्या जीवाची किंमत आपल्या वेळेपेक्षा फार बहुमूल्य असते. त्यामुळे अॅब्युलन्सचा सायरन ऐकू आला, तर थोडी मोकळी जागा द्यावी. आपत्तकालीन परिस्थितीत ही जाणीव ठेवणे हेच खरे पुण्याचे काम असल्याची भावना १०८ अॅम्ब्युलन्सवरील चालकांसह डॉक्टरांनी व्यक्त केली.

'मटा' कार्यालयातील श्रीगणेशाच्या गुरुवार (दि. ५) च्या आरतीचा मान १०८ अॅम्ब्युलन्सवरील पायलट (चालक) अरविंद आवारे, डॉ. अभय सोनवणे, पायलट राकेश जाधव आणि कैलास पवार यांना देण्यात आला. यावेळी त्यांनी आपली मते व्यक्त केली. नाशिक शहरात १०८ सेवेच्या पाच, तर उर्वरित जिल्ह्याभरात ४७ अॅम्ब्युलन्स कार्यरत आहेत. गरजू रुग्णांना कमीत कमी वेळेत हॉस्पिटलपर्यंत मोफत पोहचविण्याचे काम याद्वारे केले जाते. शहराबरोबर ग्रामीण भागातील लाखो रुग्णांना आतापर्यंत अॅम्ब्युलन्स सेवेचा लाभ देण्यात आला आहे. अपघात, बाळंतपण, आत्महत्या अशा एक ना अनेक आपत्तकालीन परिस्थितीत १०८ अॅम्ब्युलन्समुळे रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत सहजतेने पोहचता येते. काही ठिकाणी रस्ते प्रशस्त आहेत. काही ठिकाणी रस्ते अरुंद असतात. रस्त्यांच्या स्थितीपेक्षा इतर वाहनचालकांची मानसिकता महत्त्वाची असते. सायरन वाजवित येणाऱ्या अॅम्ब्युलन्सला वेळीच मार्ग मोकळा करून देण्याची जबाबदारी वाहनचालकांनी पार पाडणे गरजेचे असते. मात्र बऱ्याचदा तसे होत नसल्याची खंत या पायलट्सनी मांडली. ही सेवा ग्रामीण भागात फारच उपयुक्त असल्याचे डॉ. सोनवणे यांनी सांगितले. अत्यावस्थ रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत घेऊन येताना अॅम्ब्युलन्समधील पायलट्स, नर्स तसेच डॉक्टरांची एक घालमेल असते. रुग्ण वेळेत पोहचून त्यास उपचार मिळाला, तर त्याचे समाधान वेगळेच असते, असे सोनवणे यांनी स्पष्ट केले.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/PD9rhAAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬