उत्सवाला शतकोत्तर परंपरा

  |   Sataranews

सातारा : विशाल गुजर

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात करण्याआधीपासूनच सातार्‍यातील आझाद हिंद गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सव मंडळाची स्थापना करून हिंदु-मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला होता. 1907 साली या मंडळाची स्थापना झाली असून सातार्‍यातील हे पहिले गणेश मंडळ आहे.

सोमवार पेठेतील आझाद हिंद गणेश मंडळाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रेरणा घेवून गणेश मंडळाचे नाव आझाद हिंद ठेवले आहे. आपल्या नावाप्रमाणे सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना या मंडळात मुक्‍त प्रवेश दिला. विशेष म्हणजे हिंदूंच्या या उत्सवात या मंडळाने आपल्या पेठेतील मुस्लिम समाजालाही एकत्र घेतले आहे. तसेच या मंडळाचे अध्यक्षपदही एका मुस्लिम समाजाच्या व्यक्‍तीने तब्बल 10 वर्षे भूषवले आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटवणार्‍या या मंडळाने दांडपट्टा, ढोल वाद्यनातही चांगले प्राविण्य मिळवले होते. या मंडळाचे कै. रामभाऊ गवळी, धोंडिबा शिंदे, सिकंदर बागवान, चंद्रकांत खर्शीकर, प्रल्हाद निगडकर, हकीम मास्टर, सूरज मुल्ला, प्रल्हाद वाघोलीकर, असे अनेक वस्ताद शहराला दिले आहेत. प्रत्येक वर्षी उत्सव काळातील शेवटचे पाच दिवस महाप्रसादाचे वाटप मंडळाच्यावतीने करण्यात येते. मात्र, यंदा पूरग्रस्त परिस्थितीवर महाप्रसादाचे सर्व साहित्य पूरग्रस्तांना मदत स्वरुपात देण्यात येणार आहे. मंडळाचे कार्यकर्ते पूरग्रस्त भागात जाऊन या मदतीचे वाटप करणार आहेत. या मंडळाच्यावतीने विविध उपक्रमही राबवण्यात येतात. गतवर्षी कॅन्सरवर प्रबोधन करण्यात आले होते. तसेच थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते. तब्बल 112 वर्षांची परंपरा लाभलेल्या आझाद हिंद मंडळाने आजही आपला वसा आणि वारसा जोपासला असल्याचे मंडळाचे अध्यक्ष अवधूत किर्वे यांनी सांगितले. यापुढेही सामाजिक बांधिलकी जपत मंडळ सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/Centennial-tradition-of-celebration/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Satara/Centennial-tradition-of-celebration/

📲 Get Satara News on Whatsapp 💬